तळणीचे मोदक 

तळणीचे मोदक 

सारणाचे साहित्य : 

दोन वाट्या किसलेले खोबरे, अर्धा वाटी खसखस, दोन खारकांची जाडसर पूड, पाव वाटी काजूचे तुकडे, दोन चमचे बेदाणे, अर्धा चमचा वेलदोडा पूड, दोन वाट्या पिठीसाखर 

कृती : 

सारण तयार करण्यासाठी सुके खोबरे भाजून हाताने कुस्करून घ्यावे आणि किंचित गार झाल्यावर सारणाचे इतर साहित्य त्यात मिक्स करून ठेवावे. 

कव्हरसाठी साहित्य : 

दोन वाट्या बारीक रवा, दोन वाट्या मैदा, चार चमचे कडकडीत तेल, एक वाटी दूध, एक वाटी पाणी आणि पाव चमचा मीठ 

कृती : 

रवा, मैदा, तेलाचे मोहन, मीठ असे एकत्र दूध आणि पाण्याने घट्ट भिजवून घ्यावे. दूध आणि पाणी लागेल तसे घालावे.

मैदा नसल्यास रवा आणि कणिक एकत्र भिजवावी भिजवलेला गोळा थोडा कुटून घ्यावा. त्याच्या लहान सुपारीएवढ्या गोळ्या कराव्या. आणि त्यांच्या पातळसर पुऱ्या लाटाव्या. 

त्यात साधारण अर्धा ते पाऊण चमचा सारण भरावे. हाताने पुरी धरून दोन बोटांच्या चिमटीने कडेने थोडी थोडी दाबावी. आणि मोदकाचा आकार द्यावा.

आठ दहा मोदक झाले कि तेलात अगर तुपात तळून घ्यावे. हे मोदक पाच ते सहा दिवस वातावरण थंड असल्यास चांगले टिकतात. याच कव्हरच्या ओल्या नारळाच्या सारणाचे हि मोदक छान होतात. ओल्या नारळाचे असल्यास ते दोन दिवस राहतात.