पुरण पोळी
साहित्य :
तीन वाट्या हरबरा डाळ, दोन वाट्या चिरलेला गुळ, एक वाटी साखर, अर्धा चमचा जायफळ पूड, पाव चमचा वेलदोडा पूड, सात ते आठ वाट्या पाणी, दिड भांडे चाळलेली कणिक, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तेल, पोळी लाटण्यासाठी तांदुळाची पिठी
कृती :
प्रथम पाण्याचे आधण ठेवावे. उकळी फुटली कि डाळ धुवून त्यात टाका. पाच मिनिटांनी येता जाता थोडे हलवत राहा. डाळ हाताला मऊ शिजलेली लागली कि चाळणीत ओतावे. चाळणी पातेल्यावर ठेवा म्हणजे खाली राहिलेले पाणी म्हणजे आमटीचा कट मिळेल.
शिजलेली डाळ पातेल्यात घालून मोठ्या डावाने ठेचावी. नंतर त्यात गुळ, साखर घालून शिजण्यास ठेवावे. डावाने वरचेवर हलवत राहावे. नाहीतर गुळ तळाला लागून पुरण करपू शकते.
पुरण जसे जसे शिजू लागेल तसे त्याचे चटके उडू लागतात. म्हणून सांभाळून पुरण हलवावे. पुरण शिजल्याची खुण म्हणजे पातेल्याच्या वरचे कडेचे पुरण कोरडे दिसू लागते आणि पुरणात चमचा ठेवल्यास चमचा पडत नाही. म्हणजे पुरण पाहिजे तसे घट्ट शिजलेले असते.
त्यानंतर गॅस बंद करावा. पुरण बेताचे कोमट झाल्यावर त्यात जायफळ, वेलदोड्याची पूड घालून यंत्रावर बारीक वाटावे. मिक्सरमध्ये हि पुरण वाटता येईल पण ते जरासे रवाळ राहते.
कणिक आणि मैदा मीठ घालून नेहमीच्या कणकेसारखी भिजवावी. तेलाचा भरपूर हात लावून काही वेळ झाकून ठेवावी. तासाभराने पाण्याचा जरासा शिपका मारावा. तेलात पुन्हा तिंबून घ्यावी. हाताला तेल लावून कणिक उलट सुलट करावी म्हणजे कणकेला तार सुटते.
पोळी करतांना मोठ्या लिंबाएवढी कणिक तेलासकट हातात घ्यावी. उंडा खोलगट करावा. त्यात कणकेच्या दीडपट पुरणाचा गोळा घालावा. तांदुळाच्या पिठीवर अलगद हाताने पोळी लाटावी. फार पातळ लाटू नये. मध्यम गॅसवर तवा गरम करून पोळी चांगली शेकावी. पोळी उलथणे घालून खालून शेकली गेली आहे का हे आधी पाहावे आणि मगच पोळी उलटावी. पुरणपोळी शक्यतो एकदा उलटल्यावर पुन्हा उलटू नये. थोडे तूप सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजावी.
गरमा गरम कटाच्या आमटीसोबत पुरण पोळी वरून तूप सोडून वाढावी.
खास टिप्स :
* यामध्ये गुळ आणि साखरेचे प्रमाण निम्मे निम्मे ठेवले तरी चालते.
* पुरण यंत्र नसल्यास स्टीलच्या जाळीतून हि पुरण हाताने रगडून चांगले वाटता येते.
* पुरण आदल्या दिवशी करून ठेवल्यास पुरण आणखी स्वादिष्ट लागते आणि पोळी चांगली होते. फाटत नाही, पुरण बाहेर सांडत नाही.
puran poli, puran poli recipe in marathi, puran poli recipe in marathi written, puran poli flatbreads, maharashtrian sweet lentil flatbreads, pooran poli, puran poli recipe with sugar in marathi,