तांदुळाची उकड 

तांदुळाची उकड 

साहित्य : 

तांदुळाचे पीठ दिड वाटी, अर्धी वाटी आंबट ताक, एक वाटी पाणी, पाच सहा हिरव्या मिरच्या किंवा चमचाभर लाल तिखट, मीठ, चवीपुरती साखर, आठ ते दहा कढीपत्ता पाने, कोथिंबीर, तीन चमचे तेल, मोहरी, हळद, हिंग, जिरे 

कृती : 

प्रथम तेल तापत ठेवावे. त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून फोडणी करावी. कढीपत्ता,  मिरचीचे तुकडे, हिंग आणि अर्धा चमचा हळद फोडणीत घालून परतून घ्यावे. लगेच त्यात ताक आणि पाणी एकत्र करून ओतावे. पाण्यात मीठ घालावे. 

या पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदुळाचे पीठ हळू हळू टाकावे आणि सारखे ढवळत राहावे. या वेळी गॅस मंद ठेवावा. सगळे नीट मिक्स झाले कि दोन मिनिटं झाकून चांगली वाफ काढावी. 

तांदुळाची उकड खायला देताना वरून थोडी चिरलेली कोथिंबीर आणि तूप टाकून खाण्यास द्यावे.