उंदराची टोपी

उंदराची टोपी (मराठी गोष्ट)

बालमित्रांनो आज आपण वाचूया एका उंदीरमामाची गोष्ट. 

undarachi topi marathi goshta boli marathi
undarachi topi marathi goshta boli marathi

तर  एकदा काय झाले, एका गावात एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.

फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. 

धोब्याला म्हणाला “धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे”. धोब्याने फडके धुवून दिले.

मग उंदिरमामाची स्वारी गेली शिंप्याकडे.  

आणि त्याला म्हणाला, “शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे  आणि तिला रंगीत गोंडेही लाव”. 

शिंपीदादाला उंदराची फार गंमत वाटली. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.

उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली. हातात एक ढोलके घेतले. 

ते वाजवत तो गाणे गाऊ लागला “राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !”

राजाने हे ऐकले. त्याला राग आला. 

तो शिपायांना म्हणाला “जा रे, त्या उंदराला पकडून आणा.”

शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. 

हे बघून तो इटुकला उंदीर हि चिडला. 

मग उंदिरमामा म्हणाला “राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !” हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली.

उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली आणि तो गाणे गाऊ लागला “राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !” हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

अशी केली उंदराने राजाची फजिती!

तर बालमित्रांनो तात्पर्य असे कि, कोणी आकाराने लहान असले तरी बुद्धीचा वापर करून कोणत्याही प्रसंगातून बाहेर निघू शकते. 

Scroll to Top