उपमा
साहित्य :
रवा दोन वाट्या, सहा ते सात हिरव्या किंवा लाल मिरच्या,एक मोठा कांडा, एक चमचा उडीद डाळ, एक मूठ शेंगदाणे, फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग
कृती:
प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. कोरडा भाजला तरी चालेल किंवा किंचित तुपावर मंद आचेवर भाजून घ्यावा. नंतर चार वाट्या पाणी तापत ठेवावे.
कढईमध्ये तेल तापत ठेवून, तेल तापल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि हिंग टाकावे.
त्यातच बारीक चिरलेला कांदा, दाणे, कढीपत्ता, उडीद डाळ टाकावी. सर्व जिन्नस मिनिटभर चांगले परतून घ्यावे. आणि आधण आलेले पाणी सावकाश ओतावे. एकदम ओतल्यास हातावर उडून चटका लागू शकतो म्हणून सावकाश ओतावे.
उकळी येताच रवा अलगद घालावा. चांगले हलवावे आणि झाकण ठेवावे.
पाणी कमी वाटल्यास वरून अर्धी वाटी पाणी घालण्यास हरकत नाही. काही वेळेस रव्यास पाणी जास्त लागते.
उपमा खायला देतांना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबरे भुरकून द्यावा.