प्रवासासाठी पदार्थ विविध पोळ्या भाग १ | Food for Journey Marathi

दुधातली दशमी | Dudh Dashmi Marathi Recipe

साहित्य : 

कणिक एक वाटी, जरुरीप्रमाणे दूध, साखर दोन चमचे, मीठ, तूप दोन चमचे आणि तांदळाची पिठी 

कृती : 

कणिक, साजूक तूप, मीठ आणि साखर घालून दुधामध्ये बेताचं घट्ट पीठ भिजवून घ्यावे. दहा मिनिटं झाकून ठेवावं. 

मध्यम आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने गोल लाटावा. दशमी घडी न घालता साध्या फुलक्याप्रमाणे जाडसर आणि गोल लाटून घ्यावी. 

तवा गरम झाल्यावर तव्यावर तूप सोडून मध्यम आचेवर खरपूस भाजावी. गार झाल्यावर डब्ब्यात भरून ठेवाव्या.  

या दशम्या डब्ब्यात देता येतात किंवा प्रवासातही लोणच्याबरोबर खाता येतात. 

खमंग प्रवासी पोळी | Protein Roti for Journey

साहित्य : 

कणिक एक वाटी, डाळीचं पीठ पाव वाटी, ओवा एक लहान चमचा, तीळ एक चमचा, तेल पाव वाटी, मीठ, तिखट, धने जिरे पूड आणि पाणी 

कृती : 

गव्हाचं आणि डाळीचं पीठ एकत्र करून घ्यावं. त्यात तिखट, मीठ, ओवा, तीळ, धने जिरे पूड आणि पाव वाटी तेलापैकी निम्मं तेल मोहन म्हणून घालावं. पाण्याने घट्ट मळून घ्यावं. 

आता या पिठाच्या नेहमीप्रमाणे पोळ्या लाटून तेल लावून खमंग भाजून घ्याव्या. थंड झाल्यावरच डब्ब्यात भरून ठेवाव्या.

खास टिप्स :   

या पोळ्यांची कणिक सैल भिजवली तर पोळ्या टिकत नाही. घट्ट कणिक भिजवली तर या पोळ्या सात आठ दिवस टिकतात. 

खाकरा | Khakra Recipe in Marathi

साहित्य :

कणिक एक वाटी, डाळीचं पीठ एक चमचा, तेल दोन चमचे, चवीपुरतं मीठ, आणि पाणी 

कृती : 

आधी तेल आणि मीठ घालून कणिक जरा घट्ट मळावी. दहा ते पंधरा मिनिटांनी खाकरे करण्यास घ्यावे. 

मोठ्या लिंबाच्या आकाराएवढा गोळा घ्यावा. त्याला तेल किंवा तूप न लावता पिठावर गोल आणि पापडासारखी अगदी पातळ लाटावी. 

तव्यावर टाकून मंद आचेवर फडक्याने दाबत गोल फिरवत खाकरा दोन्ही बाजूने खमंग भाजावा. भाजतांना फुगू  नये. नाही तर तो मऊ पडतो. हे खाकरे महिनाभर टिकतात. 

खास टिप्स : 

* याच पिठात तिखट, मीठ, मेथी, आणि कोथिंबीर घालून वेगळ्या चवीचे खाकरे करता येतात. 

* टोमॅटो आणि पालकाचा रस हि टाकून नवीन पद्धतीने करता येतात.  

* गव्हाच्या पिठावर मटकीचे पीठ, मुगाचं पीठ थोडं थोडं मिसळून केलेले खाकरे अधिक चविष्ट आणि पौष्टिक होतात. 

बेसन पोळी | Besan Roti Recipe in Marathi

साहित्य : 

पाव वाटी तेल, दोन वाट्या डाळीचं पीठ, तीन मिरच्या किंवा दिड चमचे तिखट, पाच ते सहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी दाण्याचा कूट, एक चमचा मीठ, एक चमचा जिरं, दोन वाट्या कणिक, चार चमचे तेल आणि दोन वाट्या पाणी 

कृती : 

दोन वाट्या डाळीच्या पिठात मीठ घालावं. मग लसूण , जिरं, मिरची आणि दाण्याचे कूट बारीक वाटून त्याचा गोळा या पिठात मिसळावा आणि दोन वाट्या पाणी घालावं. 

आता कढईमधे पाव वाटी तेल घालून तापवावं. त्यात हे मिश्रण ओतावं आणि थोडे हलवून झाकण ठेवावे. दोन तीन चांगल्या वाफ येऊ द्याव्या आणि मग ते मिश्रण गार होऊ द्यावे. मिश्रणाचा गोळा झाला पाहिजे. 

दरम्यान कणिक नेहमीप्रमाणे भिजवावे. आणि तेल लावून मऊ करून घ्यावी. मग पुरणाच्या पोळ्या करतो तश्या उंडा भरून या बेसन पोळ्या कराव्या. फक्त बेसनाचा गोळा पोळीत भरण्याआधी कोरड्या कणकेत घोळवून घ्यावा आणि मग भरावा म्हणजे चांगला लाटता येतो. 

या पोळ्या बिडाच्या किंवा नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून खरपूस भाजवाव्या. 

मसाला पोळी | Masala Roti Recipe in Marathi

साहित्य : 

कणिक एक वाटी, मीठ, पाणी, गोड मसाला, तिखट, मीठ आणि दोन चमचे तेल 

कृती : 

नेहमीच्या पोळी प्रमाणे कणिक तेल आणि मीठ घालून भिजवून घ्यावी. मुठीएवढा गोळा घेऊन त्याच्यी फुलक्याएवढी पोळी लाटून घ्यावी. या पोळीवर तेल लावून त्यावर तिखट, मीठ, मसाल्याचं मिश्रण पसरून अर्धी घडी घालावी. या अर्ध्या घडीवर पुन्हा तेल, मीठ आणि मसाल्याचं मिश्रण लावून अर्धी घडी घालावी म्हणजे त्रिकोणी घडीची पारी तयार होईल. 

हि पारी नेहमीप्रमाणे लाटावी. तव्यावर खमंग भाजून तेल सोडून पुन्हा एकदा भाजून घ्यावी. 

कांद्याची पोळी | Onion Roti Recipe in Marathi

साहित्य : 

दोन मोठे कांदे, सुकं खोबरं, तीळ, खसखस, गरम मसाला, चमचाभर चिंचेचा दाट कोळ, बारीक चिरलेला गुळ दोन चमचे, चवीनुसार तिखट, मीठ आणि चिमूटभर हळद, गव्हाचं पीठ आणि तेल दोन चमचे 

कृती : 

प्रथम कांदे किसून घ्यावे. सुकं खोबरं, तीळ, खसखस सगळं वेगवेगळं भाजून घ्यावे. त्यात गरम मसाला घालून सगळं एकत्र वाटून घ्यावं. हे वाटण आणि गुळ कांद्याच्या किसात घालून नीट मिसळून घ्यावं. 

चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद घालून दोन चमचे तेल घालावं. 

या मिश्रणाला पाणी सुटतं. त्यात मावेल एवढी कणिक घालून गोळा मळून घ्यावा. पोळ्या लाटाव्या. आणि तेल सोडून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्याव्या.   

recipe for journey, travel food recipes, road trip recipes, homemade indian snacks for travelling, travel snacks, road trip food list, travel snacks for adults, प्रवासात खाण्याचे पदार्थ, प्रवासातले पदार्थ, प्रवासात न्यायच्या पाककृती, प्रवासाला जाताना सोबत न्या हे घरगुती खाद्यपदार्थ, khara recipe, wheat khakra, best indian food for journey, best food for journey, how to prepare food for journey, food for journey in train, food for long journey in train, food for children in journey