चिकन बिर्याणी
चिकन बिर्याणी म्हणजे नॉनव्हेज खवय्यांसाठी अगदी खास. अगदी निगुतीने केली गेलेल्या बिर्याणीच्या पहिल्या घासाआधीच आपल्या खास सुगंधाने हि बिर्याणी आपल्या मनात घर करते. अशीच मन जिंकणारी चिकन बिर्याणीची रेसिपी नक्की करून बघा.
साहित्य :
अर्धा किलो जुने बासमती तांदूळ, पाऊण किलो मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ३ चमचे आलं लसूण पेस्ट,
हळद, १ चमचा लाल तिखट, २ चमचे बिर्याणी किंवा चिकन मसाला, दालचिनी आणि जायफळ पावडर प्रत्येकी १ छोटा चमचा, २ मध्यम टोमॅटोची पेस्ट, अर्धा किलो कांदे, १ वाटी दही, सालं काढून जाडसर फोडी केलेले बटाटे पाव किलो , लवंग, तमालपत्र, दालचिनी, वेलची, काजू तुकडा, २ उकडलेल्या अंड्याच्या लांबट फोडी, चवीनुसार मीठ
कृती :
चिकन स्वच्छ करून घ्यावे. त्याला दही, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, चिकन किंवा बिर्याणी मसाला आणि टोमॅटो पेस्ट चांगली लावून घ्यावी. झाकून बाजूला ठेवावे.
उभे चिरलेले कांदे तेलात लालसर तळून घ्यावे. आणि तेल निथळून त्यावर थोडे मीठ भुरभुरावे.
जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून खडा मसाला चांगला परतून घ्यावा. आता त्यात धुतलेले तांदूळ घालून चांगले मोकळे परतून घ्यावे.
भातानुसार पाणी घालून मोकळा फडफडीत भात शिजवून घ्यावा. तयार भात परातीत उपसून घ्यावा.
कढईत तूप घालून त्यात खडा मसाला घालून परतून घ्यावा. कांदा हि चांगला परतून घ्यावा. त्यानंतर त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून चांगले परतून घ्यावे.
त्यात अगदी थोडे पाणी घालून चिकन थोडे शिजवून घ्यावे. चिकन शिजले हि पाहिजे आणि पाणी हि थोडे कोरडे झाले पाहिजे.
दुसऱ्या जाड बुडाच्या हंडीत तूप घालावे. त्यावर बटाट्याच्या फोडी पसरून घ्याव्या. आता वर एक थर चिकनचा, एक थर भाताचा द्यावा. त्यावर दालचिनी जायफळ पावडर थोडी भुरभुरावी.
असे सगळे थर द्यावे. सगळ्यात वरच्या थरावर तळलेला कांदा आणि तळलेले काजू घालावे. थोड्या अंतराने भाताला थोडी भोकं पाडून त्यात साजूक तूप घालावे.
आता या हंडीवर झाकण घट्ट ठेवून भिजवलेल्या कणकेने ते झाकण हंडीला घट्ट चिकटवून घ्यावे.
गॅसवर तवा ठेवून त्यावर हंडी ठेवून मंद आचेवर बिर्याणी शिजवून घ्यावी.
हि मस्त चिकन बिर्याणी दही किंवा रायत्यासोबत सर्व्ह करावी.
चिकन बिर्याणी, chicken biryani, chicken recipes, chicken biryani recipe in marathi, boli marathi, sunday special recipes, मराठी रेसिपीज, चिकन बिर्याणी रेसिपी मराठी, सोपी चिकन बिर्याणी