अनारसे रेसिपी मराठी | How to make anarse

अनारसे रेसिपी मराठी 

साहित्य :

तांदूळ १ वाटी, किसलेला गूळ १ वाटी, तूप १ चमचा , खसखस ,तेल

कृती :

तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलले तरी चालेल.

त्यानंतर चाळणीत ठेवून नितळून घ्यावे. तांदूळ आता कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे.

किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाकावा. सर्व मिश्रण एकत्र मळून घ्यावे. मिश्रण घट्ट मळावे. घट्ट मळलेला गोळा चार – पाच दिवस डब्यात ठेवावा. (प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी डब्यात ठेवावी.)

तळण्यासाठी आता पीठ बाहेर काढून घ्यावे. एका कढईत तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याचे आता छोटे छोटे गोळे करावे.  पुरीसारखे लाटून घ्यावे.

लाटताना त्यावर खसखस वापरावी.  (काहीवेळा राजगिरा वापरला तरी चालतो.)  आणि तळताना पुरीची बाजू बदलू नये, नाहीतर खसखस करपेल.

लाटलेली पुरी तेलात तळताना जास्त हलवू नये. मध्यम आचेवर ठेवून पुरी छान लालसर तळून घ्यावी.

तेल अनारस्यातून चांगले निथळून घ्यावे. आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवावे. 

खास टीप 

मळलेले मिश्रण (पीठ) खूप दिवस टिकून राहते. त्यामुळे तळताना जर अनारसे फेसाळले तर पीठ तसेच ठेवून काही दिवसांनी तळावे.

anarse recipe, anarse recipe in marathi, अनारसे, diwali sweets, diwali faral recipes, diwali faral recipes in marathi,