चटकदार कैरीचे लोणचे
कैरीचा मौसम सुरू झाला की घराघरांत लोणच्याचा सुगंध दरवळायला लागतो. उन्हाळा आणि कैरीचे लोणचे हे समीकरण आपल्या मराठी घरांमध्ये अगदी जिव्हाळ्याचं आहे.
आजकाल बाजारात अनेक प्रकारची लोणची सहज मिळतात, पण घरच्या हातचं लोणचं जे समाधान आणि चव देतं, ते कुठेच मिळत नाही. आमच्या घरी तर दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच “यंदा लोणचं कधी करायचं?” याची चर्चा सुरू होते.
माझ्या आईकडून शिकलेली ही कैरीच्या लोणच्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करतेय. ही रेसिपी अगदी पारंपरिक आहे आणि योग्य प्रमाणात मसाले वापरले तर लोणचं वर्षभर टिकतं.
गरम भाकरी, वरण-भात किंवा अगदी साध्या पोळीबरोबरही हे लोणचं अप्रतिम लागतं.

कैरीचे लोणचे करण्यासाठी लागणारे साहित्य:-
* १ किलो कच्च्या, घट्ट कैऱ्या
* १०० ग्रॅम मोहरीची डाळ
* ५० ग्रॅम मेथीदाणे
* २ टेबलस्पून हळद
* १०० ते १२५ ग्रॅम तिखट (आपल्या आवडीनुसार)
* १५० ग्रॅम मीठ
* २५० ते ३०० मिली तेल
* चिमूटभर हिंग
कैरी निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा:-
लोणच्यासाठी कैरी निवडणं खूप महत्त्वाचं असतं. कैऱ्या घट्ट, ताज्या आणि आंबट असल्या पाहिजेत. खूप पिकायला आलेल्या किंवा मऊ कैऱ्या वापरू नका, नाहीतर लोणचं पटकन खराब होऊ शकतं.
शक्यतो राजापुरी किंवा लोणच्यासाठी खास वापरल्या जाणाऱ्या कैऱ्या घेतल्या तर चव उत्तम येते.
कैरीच्या लोणच्याची कृती:-
सर्वात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून पूर्ण कोरड्या करून घ्या. पाण्याचा अंश राहिला तर लोणचं खराब होऊ शकतं, त्यामुळे ही स्टेप अजिबात घाईत करू नका. कैऱ्या मध्यम आकाराच्या फोडींमध्ये कापून घ्या. आठोळ्या काढून टाकायच्या नाहीत, कारण त्यामुळेसुद्धा लोणच्याला एक वेगळी चव येते.
यानंतर एका मोठ्या भांड्यात कैरीच्या फोडी घेऊन त्यात मीठ आणि हळद घाला. हे मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून साधारण ५-६ तास झाकून ठेवा. यामुळे कैरी थोडी मुरते आणि तिच्यातील पाणी बाहेर येतं.
तोपर्यंत मेथीदाणे हलकेसे भाजून घ्या. जास्त भाजू नका नाहीतर कडवटपणा येऊ शकतो. भाजलेले मेथीदाणे थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या. मोहरीची डाळ, तिखट, मेथी पूड आणि हिंग एकत्र करून मसाला तयार करा.
एका कढईत तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की गॅस बंद करून ते पूर्ण थंड होऊ द्या. गरम तेल थेट लोणच्यात घातलं तर कैरी शिजू शकते आणि चव बदलू शकते.
आता कैरीच्या फोडींमध्ये तयार मसाला घाला आणि सगळं व्यवस्थित मिसळून घ्या. शेवटी थंड झालेलं तेल घालून पुन्हा एकदा चांगलं हलवा. प्रत्येक फोडीला मसाला आणि तेल लागलं पाहिजे.
तयार लोणचं स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. साधारण ३-४ दिवसांनी लोणचं छान मुरतं आणि खायला तयार होतं.
लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी काही टिप्स:-
लोणचं करताना स्वच्छता खूप महत्त्वाची असते. वापरणारी भांडी, चमचे आणि बरणी पूर्ण कोरडी असली पाहिजेत. लोणचं काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा.
तेलाचं प्रमाण कमी करू नका. तेलामुळे लोणचं टिकून राहतं आणि चवही छान लागते. जर काही दिवसांनी लोणचं कोरडं वाटायला लागलं, तर थोडं गरम करून थंड केलेलं तेल वरून घालू शकता.
काही जण लोणच्यात लसूणही घालतात. तुम्हाला आवडत असेल तर १०-१२ पाकळ्या घालू शकता. त्याने चव आणखी छान लागते.
आजकाल बाजारात कितीही प्रकारची लोणची मिळाली तरी घरच्या लोणच्याची गोष्ट वेगळीच असते. त्यात घरचा स्वाद असतो, आईच्या हातची आठवण असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात प्रेम असतं.
माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आई लोणचं करताना आम्ही सगळे तिच्या भोवती बसायचो. कैऱ्या पुसून देणं, मसाला मिसळणं, बरणी धरून ठेवणं अशी छोटी छोटी कामं आम्हाला मिळायची. त्या वेळी कदाचित त्याचं महत्त्व कळत नव्हतं, पण आज स्वतः लोणचं करताना त्या आठवणी खूप खास वाटतात.
गरम वरण-भातावर थोडंसं तूप आणि बाजूला कैरीचं लोणच समाधान मानायला एवढंच पुरेसं असतं. साध्या जेवणालाही हे लोणचं एकदम उठावदार बनवतं.
जर तुम्ही अजून कधी घरच्या घरी कैरीचं लोणचं करून पाहिलं नसेल, तर यंदा नक्की करून बघा. एकदा ही चव लागली की बाजारचं लोणचं घ्यावंसं वाटणार नाही.
कैरीचे लोणचे, kairiche lonche, pickle recipes in marathi, marathi pickle recipe, boli marathi,