गंपू आणि समुद्र
एका हिरव्यागार जंगलात गंपू नावाचा एक गोड, गोलमटोल हत्ती राहत होता.
गंपू खूपच खट्याळ होता.
त्याला नेहमी नवीन गोष्टी बघायला, फिरायला आणि मजा करायला खूप आवडायचं.
एके दिवशी त्याचा मित्र माकड चिंपू म्हणाला,
“गंपू, तु समुद्र पाहिलाय का रे कधी?”
गंपूने मोठे डोळे करून विचारलं,
“समुद्र? तो काय असतो?”
चिंपू हसत म्हणाला,
“अरे खूप जास्त पाणी असतं तिथे! खूप म्हणजे खूपच जास्त, अगदी आभाळाएवढं!”
गंपू उड्या मारत म्हणाला,
“वा! काय मज्जा , मला पण बघायचंय! आपण जाऊया ना!”

दुसऱ्याच दिवशी सगळे मित्र – गंपू, चिंपू आणि ससा पिंटू समुद्र बघायला निघाले.
खूप चालल्यावर ते शेवटी समुद्रकिनारी पोहोचले.
गंपूने समुद्र पाहिला… आणि तो थक्कच झाला!
तो ओरडला,
“अरे वा! इतकं सगळं पाणी! कुणी एवढं भरलं इथे?”
चिंपू हसून म्हणाला,
“कोणी नाही रे, हा तर समुद्र आहे!”
गंपू धावत धावत पाण्याकडे गेला.
पण जसं तो पाण्यात गेला…
एक मोठी लाट आली — “धडाम!”
गंपू मागे घसरला आणि धप्पकन वाळूत बसला!
चिंपू आणि पिंटू जोरात हसू लागले.
गंपू चेहरा वाकडा करत म्हणाला,
“अरे! हे पाणी मला ढकलतंय!”
थोड्या वेळाने गंपू पुन्हा उभा राहिला.
तो म्हणाला,
“आता मीही तयार आहे!”
तो पुन्हा पाण्यात गेला… आणि यावेळी लाट आली तर त्याने सोंडेने पाणी उडवलं!
पिंटू म्हणाला,
“वा गंपू! तू तर पाण्याशी खेळतोयस!”
थोड्या वेळाने गंपूला वाळूत काहीतरी दिसलं.
तो म्हणाला,
“अरे हे काय आहे?”
तो एक शंख उचलायला गेला…
पण आतून एक खेकडा बाहेर आला!
“चक!” असा आवाज करत त्याने गंपूच्या सोंडेवर हलकासा चावा घेतला.
गंपू उडाला,
“अरे बापरे! कोण आहे रे हा?”
चिंपू हसत म्हणाला,
“तो खेकडा आहे! त्याला त्रास देऊ नकोस!”
गंपू थोडा रागावला,
“हा खूप खोडकर आहे! तो मला चावला”
चिंपू म्हणाला, ” अरे, तू सांभाळून शंख उचल”
थोड्या वेळाने गंपू वाळूत लोळायला लागला.
तो म्हणाला,
“वा! ही वाळू किती मऊ आहे! किती मज्जा येतेय”
तो लोळत लोळत इतका माखला, की पूर्ण पांढरट दिसायला लागला.
पिंटू म्हणाला,
“अरे गंपू, तू तर आता हत्ती नाही… मोठा लाडू दिसतोयस!”
सगळे जोरात हसू लागले.
संध्याकाळ झाली.
सूर्य हळूहळू खाली जात होता.
गंपू शांतपणे समुद्राकडे बघत म्हणाला,
“आज खूप मजा आली! समुद्र खूप छान आहे!”
चिंपू म्हणाला,
“हो, पण थोडा खोडकरही आहे! अगदी तू आहेस तसाच, मोठा आणि खोडकर”
गंपू हसत म्हणाला,
“हो! पण मला पुन्हा यायचंय इथे!”
समुद्राकडे बघून सगळे मित्र आनंदाने परत घरी जायला निघाले.
तात्पर्य:
नवीन गोष्टी अनुभवायला नेहमी तयार रहा आणि त्यातून मजा घ्या 
गंपू आणि समुद्र, baal katha, chan chan goshti, boli marathi, बाल कथा, छान छान गोष्टी