रात्रीच्या जेवणासाठी ५ हेल्दी पर्याय 

रात्रीच्या जेवणासाठी ५ हेल्दी पर्याय

दिवसभराची धावपळ संपली की संध्याकाळी शरीराला विश्रांती हवी असते. पण याच वेळेला अनेक घरांत रात्रीच्या जेवणाचा प्रश्न उभा राहतो – आज काय बनवायचं?

काही जण पटकन भात-आमटी खातात, काही जण बाहेरून ऑर्डर करतात, त्याने काही वेळा पोट भरतं पण शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

रात्रीचं जेवण हे दिवसातील सर्वात जड जेवण असण्याची गरज नाही. उलट ते हलकं, सहज पचणारं आणि पौष्टिक असलं तर झोपही छान लागते आणि सकाळी शरीर फ्रेश वाटतं. उशिरा जेवण, तेलकट पदार्थ, जास्त तिखट किंवा जड पदार्थ यामुळे अपचन, ऍसिडिटी, जडपणा आणि थकवा जाणवू शकतो.

म्हणूनच आज आपण पाहणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी ५ हेल्दी पर्याय, जे घरच्या घरी सहज बनतील, चविष्टही आहेत आणि रोजच्या आहारात उपयोगीही पडतील.

healthy dinner options recipes in marathi boli marathi
रात्रीच्या जेवणासाठी ५ हेल्दी पर्याय

१. मूगडाळ खिचडी – साधं पण संपूर्ण जेवण

रात्रीसाठी सर्वात उत्तम पर्याय म्हटलं तर मूगडाळ खिचडी. तांदूळ आणि पिवळी मूगडाळ यांचं मिश्रण शरीराला हलकं वाटतं आणि पटकन पचतं.

मुगडाळ खिचडीचे फायदे: 

* प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला समतोल
* पचनासाठी हलकी
* आजारी असताना किंवा थकवा असल्यास उत्तम

मुगडाळ खिचडी कशी बनवावी?

कुकरमध्ये तूपात जिरे, हिंग, हळद यांची फोडणी द्या. धुतलेला तांदूळ आणि मूगडाळ घालून परतून घ्या आणि गरम पाणी घालून तीन चार शिट्ट्या करा. वरून कोथिंबीर आणि तूप टाका.

मुगडाळ खिचडीसोबत काय घ्यावं?

दही, लोणचं किंवा भाजलेला पापड यांच्यासोबत हि खिचडी भन्नाट लागते. शिवाय एखादी कोरडी चटणी जसे लसूण खोबरे चटणी, जवस चटणी हि तुम्ही घेऊ शकतात. 

२. मल्टीग्रेन भाकरी + भाज्यांची भाजी

रात्री फक्त पोळीपेक्षा मल्टीग्रेन भाकरी हा चांगला पर्याय ठरू शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू यांचं मिश्रण असलेली भाकरी शरीराला फायबर देते.

 मल्टीग्रेन भाकरीचे फायदे:

* जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं
* रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत
* पचन सुधारतं

मल्टीग्रेन भाकरीसोबत कोणती भाजी करावी?

* दुधी भोपळा
* दोडका
* मेथी
* पालक
* गाजर-मटार

या भाज्या हलक्या मसाल्यात बनवल्या तर रात्री उत्तम लागतात. भाकरीवर थोडंसं तूप लावल्यास चव आणि पोषण दोन्ही वाढतं.

३. व्हेज सूप + टोस्ट / सॅलड

जर रात्री खूप जड खायची इच्छा नसेल, तर गरमागरम सूप हा उत्तम पर्याय आहे. विशेषतः उन्हाळ्यात हलकं सूप, तर हिवाळ्यात गरम भाज्यांचं सूप खूप छान वाटतं.

 कोणतं सूप बनवू शकता?

  • टोमॅटो सूप
  • मिक्स व्हेज सूप
  • स्वीट कॉर्न सूप
  • पालक सूप
  • मशरूम सूप

सूप पिण्याचे फायदे:

  • कमी कॅलरी
  • शरीराला हायड्रेशन
  • सहज पचतं

सूप बरोबर थोडं पोटभरीचं हवं असेल तर:

ब्राऊन ब्रेड टोस्ट, भाजलेले क्रुटॉन्स (ब्रेडचे तुकडे) किंवा काकडी आणि टोमॅटो यांचे सॅलड घ्या.

 हा मेनू कोणासाठी उत्तम?

वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा उशिरा जेवण करणाऱ्यांसाठी.

४. पनीर / मूग स्प्राउट्स सलाड बाउल

रात्री काहीतरी हलकं पण प्रथिनयुक्त खायचं असेल तर सलाड बाउल उत्तम. हे दिसायलाही आकर्षक असतं आणि पटकन तयार होतं.

यात काय घालू शकता?

* काकडी
* टोमॅटो
* गाजर
* उकडलेला मका
* मूग स्प्राउट्स
* भाजलेलं पनीर
* कांदा (इच्छेनुसार)
* लिंबूरस

याचे फायदे:

* प्रथिने भरपूर
* पोट भरतं
* वजन नियंत्रणासाठी मदत

चव वाढवण्यासाठी:

काळं मीठ, मिरीपूड, थोडी चाट मसाला भुरभुरा.

खास टिप:

सलाडमध्ये दही ड्रेसिंग वापरल्यास अधिक चवदार लागतं.

५. डाळ-भाजीसोबत फुलका

घरगुती आणि पारंपरिक पर्याय हवा असेल तर साधं डाळ-भाजी-फुलका यासारखं उत्तम काही नाही. पण ते योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचं.

आदर्श प्लेट कशी असावी?

* २ फुलके
* १ वाटी डाळ
* १ वाटी भाजी
* थोडं सॅलड

कोणती डाळ?

* मसूर डाळ
* तूर डाळ
* मूग डाळ
* मिक्स डाळ

 फायदे:

* संतुलित पोषण
* घरातील सर्वांसाठी योग्य
* रोजच्या आहारात सहज बसणारा पर्याय

उन्हाळ्यात जास्त तेल, तिखट आणि तळलेले पदार्थ टाळा.

 रात्री जेवताना या ५ चुका टाळा

 १. खूप उशिरा जेवण

 २. जास्त प्रमाणात खाणं

 ३. मोबाईल बघत जेवण

 ४. जेवणानंतर लगेच झोपणे

५. रोज बाहेरचं खाणं

Scroll to Top