उन्हाळ्यातील वाळवणं भाग १
उन्हाळा सुरू झाला की अंगणात, गच्चीत, टेरेसवर किंवा घराच्या मोकळ्या जागेत एक वेगळीच लगबग दिसू लागते. कुठे मोठ्या चाळणीत साबुदाण्याचे पापड वाळत असतात, कुठे कुरडया उन्हात चमकत असतात, तर कुठे लोणच्याच्या बरण्यांतून मसाल्याचा सुगंध दरवळत असतो. महाराष्ट्रात उन्हाळा म्हणजे फक्त आंबा, काकडी किंवा सरबत नाही तर वाळवणांचा सीजनदेखील आहे.
पूर्वीच्या काळी फ्रिज नव्हते, रेडीमेड पदार्थ नव्हते. त्यामुळे वर्षभरासाठी काही पदार्थ उन्हात वाळवून साठवले जात. ही फक्त गरज नव्हती, तर घरगुती शहाणपण होतं. आजही अनेक घरांत ही परंपरा जपली जाते. आज फक्त आवड म्हणून नाही तर अनेक ठिकाणी हा व्यवसाय म्हणून सुद्धा केला जातो. वर्षभर टिकणारे हे वाळवणाचे पदार्थ देशी परदेशी भरपूर विकले जातात.
आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील वाळवणं भाग १, ज्यात घराघरांत केले जाणारे काही लोकप्रिय पदार्थ आणि त्यामागची मजा जाणून घेऊया.
वाळवणं म्हणजे नेमकं काय?
भाज्या, पीठाचे पदार्थ, पापड, मसालेदार गोष्टी किंवा काही फळांचे पदार्थ उन्हात सुकवून त्यांची टिकवण वाढवण्याची पद्धत म्हणजे वाळवणं.
यामुळे:
* पदार्थ जास्त दिवस टिकतात
* वर्षभर वापरता येतात
* चव कायम राहते
* गरज पडली की पटकन बनवता येतात
आणि हे करण्यासाठी कडक उन्, स्वच्छ हवा आणि योग्य पद्धत एवढीच गरज असते.

१. साबुदाण्याचे पापड
उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय वाळवणांपैकी एक म्हणजे साबुदाण्याचे पापड. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.
साबुदाण्याचे पापड कसे बनवतात?
साबुदाणा भिजवून शिजवतात. त्यात मीठ, जिरे, मिरची घालून मिश्रण तयार करतात. नंतर प्लास्टिक शीट किंवा स्वच्छ कापडावर छोटे छोटे गोल घालून उन्हात वाळवतात.
साबुदाण्याचे पापड का खास?
* तळले की फुलून येतात
* उपवासालाही उपयोगी
* कुरकुरीत आणि चवदार
२. बटाट्याच्या चकल्या / वेफर्स
उन्हाळा आणि बटाट्याचे वेफर्स हे समीकरण अगदी ठरलेलं. घरी बनवलेले वेफर्स म्हणजे वेगळीच मजा.
कृती:
बटाटे सोलून पातळ काप करतात. मीठाच्या पाण्यात बुडवून नंतर उन्हात वाळवतात.
फायदे:
* वर्षभर साठवता येतात
* पाहुणे आले की झटपट तळता येतात
* बाजारातील वेफर्सपेक्षा घरगुती आणि स्वच्छ
३. कुरडया
कुरडया हा महाराष्ट्रातला खूप लोकप्रिय वाळवणीचा पदार्थ. पावसाळ्यात किंवा थंडीत भाजीसोबत कुरडया तळून खाण्याची मजा वेगळीच.
कशापासून बनतात?
गहू, तांदूळ किंवा मैद्याच्या पिठापासून कुरडया बनवल्या जातात.
विशेष काय?
* तळल्यावर फुलतात, खायला चॅन लागतात
* मुलांना आवडतात
* खिचडी, पुलावसारख्या पदार्थांसोबत पटकन साईड डिश तयार होते
४. सांडगे
सांडगे हा पारंपरिक पदार्थ. डाळी, मसाले आणि भाज्यांचं मिश्रण करून तयार होणारा.
कसे वापरतात?
भाजीमध्ये घालतात किंवा तळून खातात.
फायदे:
* चव वाढते
* प्रथिने मिळतात
* भाजीला वेगळा स्वाद येतो
५. लोणचं – उन्हाळ्याची चटकदार आठवण
लोणचं हे पारंपरिक वाळवण नसले तरी उन्हाळ्यातच मोठ्या प्रमाणावर तयार केलं जातं. कच्च्या आंब्याचं लोणचं तर प्रत्येक घरातलं आवडतं.
उन्हाळ्यात कैऱ्या मुबलक मिळतात आणि सूर्यप्रकाशामुळे लोणचं छान टिकून राहतं.
लोणच्याचे प्रकार:
* आंबा लोणचं
* लिंबू लोणचं
* मिरची लोणचं
वाळवण करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
१. स्वच्छता सर्वात महत्त्वाची
भांडी, वाळवणाचे कापड, हात, वाळवण सुकवण्याची जागा सगळं स्वच्छ असावं.
२. उन्हाची वेळ
सकाळपासून दुपारपर्यंत कडक ऊन मिळालं तर उत्तम.
३. ओलावा राहू देऊ नका
वाळवण पूर्ण सुकलेलं असणं गरजेचं आहे. नाहीतर पदार्थ खराब होऊ शकतो.
४. साठवण योग्य पद्दतीने करा
एअरटाईट डब्यात किंवा बरणीत ठेवा.
५. वेळोवेळी तपासा
जेव्हा आपण वाळवणाचे पदार्थ जास्त काळापर्यंत साठवतो तेव्हा ते मध्ये मध्ये चेक करत राहणे गरजेचे असते तर ते खराब होऊ शकते.
उन्हाळ्यात आजी, आई, मावशी, काकू सगळ्या मिळून वाळवण करताना गप्पा मारत बसायच्या. मुलं पापड चोरून खायची. कुणी चाळणी धरायचं, कुणी मिश्रण घालायचं. वाळवणं म्हणजे फक्त पदार्थ नव्हे, तर घरातला उत्सव होता.
आजकाल वेळ कमी असला त्यामुळे हि परंपरा आज कमी कमी होत चालली आहे.
आज बाजारात सर्व काही मिळतं. तरी घरगुती वाळवणांना वेगळी किंमत आहे.
* प्रिझर्वेटिव्ह नसतात
* चव अस्सल असते
* खर्च कमी होतो
* घरगुती समाधान मिळतं
उन्हाळा फक्त तापमान वाढवत नाही, तो आठवणीही उबदार करतो. घराच्या टेरेसवर पसरलेले पापड, उन्हात चमकणाऱ्या कुरडया आणि मसाल्याचा दरवळ हीच खरी भारतीय उन्हाळ्याची ओळख आहे.
तुमच्या घरी अजूनही वाळवणं केली जातात का? जर नाही, तर यंदा छोट्यापासून सुरुवात करा. एक पापड जरी केला तरी काही छान छान आठवणींना उजाळा मिळू शकेल.
भाग २ मध्ये आपण पाहू – शेवया, खारोड्या, टोमॅटो वाळवण, कारल्याचे काप आणि अजून काही खास प्रकार
उन्हाळी वाळवण, unhali vaalvan recipes, sabudana chaklya recipes, recipes in marathi, potato wafers recipe, summer recipes, boli marathi,
Pingback: उन्हाळ्यातील वाळवणं भाग २ - बोली मराठी