कृष्णाचा पाळणा
आपली मराठी भाषा खूप विविध प्रकारे समृद्ध आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळी अंगाई गीतं, पाळणे, बडबड गीतं यांचे खूप प्रकार आपल्याकडे आहेत.
असाच एक पाळणा इथे दिला आहे.
श्री कृष्ण बाल रूपात असताना, त्यांना झोप येण्यासाठी यशोदा माता त्यांना झुलवून हा पाळणा गुणगुणते आहे. असा हा कृष्णाचा पाळणा.

कृष्णाचा पाळणा
बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥
जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।
पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥
बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।
जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥
मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।
शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥
रत्नजडित पालख । झळके आमोलिक ।
वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥
हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥
विश्वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।
तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥
गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।
कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥
विश्वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।
प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥
विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।
शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥
उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।
यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥
गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।
दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥
इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।
गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥
कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।
खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥
ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।
पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥
कृष्णाचा पाळणा, krushnacha palna, lyrics in marathi, angai geet in marathi, shri krishna, boli marathi,