चिकन करी

चिकन करी

साहित्य : 

चिकन पाव किलो, कांदा ३ मध्यम आकाराचे, बारीक चिरुन,लसणाच्या पाकळ्या ८-१०, आलं १/२ इंच, सुकं खोबरं ३ मोठे चमचे, २/३ लवंगा, काळी मिरी, १/२ इंच दालचिनीचा तुकडा, गरम मसाला २ चमचे, लाल तिखट २ चमचे, काजुची पेस्ट २ चमचे, जीरे, तेल, हळद, मीठ – अंदाजाने लागेल तसं.
कोथिंबीर – आवडीनुसार.

ऐच्छिक जिन्नस:
टोमॅटो – १ लहान, अगदी बारीक चिरुन.

 कृती:  

वाटण :-
१. पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालुन लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकुन परतुन घ्या.
२. त्याच पॅनमध्ये आधीचा खडा मसाला न काढता कापलेल्या कांदयाच्या २/३ कांदा परतुन घ्यावा.

३. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात सुकं खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या, आलं बारीक तुकडे करुन सगळं ब्राऊन कलरचं होईपर्यंत परतुन घ्या.
४. हे सगळ गार झालं की लागेल तसं पाणी टाकुन मिक्सरमधुन खुप बारीक वाटण करुन घ्या.

मुख्य कृती :-
१. चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं.
२. कुकरमध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात.
३. लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं.
४. टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं.
५. थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं.
६. मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.
७. कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल.
८. आता कढईमध्ये २-३ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला.
९. नंतर वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात काजुची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालुन अजुन १-२ मिनिटं परतुन घ्या.
१०. ह्यात कुकर मधलं चिकन आणि सुप घाला. करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला.
११. चवी प्रमाणे मीठ घाला, एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला.
१२. उकळी आल्यावर अजुन १०-१२ मिनिटं मंद आचेवर उकळु घ्या.