शूर राजकुमारी (Shur Rajkumari Marathi Goshta)
एका सुंदर राज्यात केतकी नावाची एक गोड आणि शूर राजकुमारी राहत होती.
केतकीला राजवाड्यात राहायला आवडायचं, पण तिला बाहेर फिरणं, झाडं-पक्षी बघणं आणि नवीन जागा शोधणं जास्त आवडायचं.
ती नेहमी म्हणायची,
“मला फक्त महालात बसायचं नाही. मला पूर्ण जग फिरून बघायचं आहे!”
एके दिवशी सकाळी केतकी आपल्या घोड्यावर बसून जंगलाच्या दिशेने फिरायला निघाली.
तिच्यासोबत दोन सैनिक होते.
जंगल खूप सुंदर होतं. मोठी झाडं, गोड पक्ष्यांचे आवाज आणि थंड हवा.
केतकी आनंदाने म्हणाली,
“वा! किती छान जागा आहे! किती मज्जा येतेय! “
फिरता फिरता केतकी एका रंगीबेरंगी फुलपाखरामागे गेली.
ती त्याला पकडायला धावत गेली…आणि थोड्या वेळाने तिला कळलं की ती खूप दूर आली आहे.
ती इकडे तिकडे पाहू लागली.
सैनिक कुठेच दिसत नव्हते.
घोडाही मागे राहिला होता.
केतकी थोडी घाबरली.
ती म्हणाली,
“अरे कोणीच दिसत नाहीय, बहुदा मी रस्ता चुकले!”

जंगलात संध्याकाळ व्हायला लागली.
पानांची सळसळ होत होती.
दूर कुठेतरी घुबड ओरडत होतं.
पण केतकीने धीर सोडला नाही.
ती स्वतःशीच म्हणाली,
“मी राजकुमारी आहे. मी रडणार नाही. मी विचार करून रस्ता शोधेन.”
मग तिला बाबांनी सांगितलेलं आठवलं.
तिचे बाबा म्हणजे राजा नेहमी म्हणायचे,
“अडचण आली की घाबरू नकोस. शांत राहा आणि विचार कर. अडचण कितीही मोठी असली तरी आपण शांत राहिलो तर मार्ग आपोआप सापडतो”
केतकीने खोल श्वास घेतला.
तिने जमिनीवर घोड्याच्या पावलांचे ठसे शोधायला सुरुवात केली.
थोड्या वेळाने तिला काही ठसे दिसले.
ती म्हणाली,
“हे ठसे आपल्याच घोड्याचे असतील. याच्या दिशेने जाते”
ती त्या दिशेने चालू लागली.
चालताना तिला एक छोटा ससा दिसला.
ससा पुढे पुढे पळत होता.
केतकी हसली,
“चल, तू पण माझ्यासोबत ये.”
थोडं पुढे गेल्यावर तिला नदीचा आवाज ऐकू आला.
तिला आठवलं कि जंगलाच्या काठाशी नदी आहे.
ती म्हणाली,
“जर मी नदीपर्यंत पोहोचले, तर मला महालाचा रस्ता नक्कीच सापडेल!”
ती धैर्याने चालत राहिली.
काही वेळाने तिला नदी दिसली.
ती खूप आनंदी झाली.
नदीच्या काठाने चालत चालत ती जंगलाबाहेर आली.
तेवढ्यात दूरून सैनिकांचा आवाज आला.
“राजकुमारी केतकी! राजकुमारी केतकी!”
केतकी ओरडली,
“मी इथे आहे!”
सैनिक धावत आले.
ते म्हणाले,
“राजकुमारी! आम्ही खूप शोधत होतो तुम्हाला!”
केतकी हसून म्हणाली,
“मी पण स्वतःच रस्ता शोधला!”
सगळे तिला घेऊन राजवाड्यात आले.
राजा आणि राणी तिला पाहून खुश झाले.
राजा म्हणाले,
“आज तू फक्त राजकुमारी नाही, तर खऱ्या अर्थाने शूर मुलगी आहेस.”
केतकी हसली आणि म्हणाली,
“बाबा तुम्हीच म्हणाला होतात ना कि, धैर्य ठेवलं की रस्ता सापडतो. तुमचे बोलणे लक्षात ठेऊन आज मी हि तसेच केले. म्हणून मला घरचा रस्ता सापडला”
राजा आणि राणी म्हणाले, ” बेटा, आयुष्यात नेहमी असेच धैर्य ठेव”.
तात्पर्य:
अडचण आली तरी घाबरू नका. धैर्य आणि शांत विचाराने मार्ग सापडतो.
ह्या गोष्टीसुद्धा नक्की वाचा:-
मराठी गोष्टी, छान छान गोष्टी, बालकथा, लहान मुलांसाठी गोष्टी, नीतिमत्ता गोष्टी, moral stories for kids, stories for kids in marathi, stories in marathi, boli marathi,