काळा मसाला 

महाराष्ट्राच्या चवीचं गुपित – खमंग “काळा मसाला” 

महाराष्ट्रीयन स्वयंपाक म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या झणझणीत भाज्या, खमंग आमटी, मसाले भात आणि रस्सेदार कालवण. या प्रत्येक पदार्थामागे एक खास चव दडलेली असते आणि त्या चवीचं खरं रहस्य म्हणजे “काळा मसाला”.

गावाकडच्या घरात उन्हाळा सुरू झाला की मिरच्या, मसाले, पापड, कुरडया यांच्यासोबत काळा मसालाही तयार करण्याची लगबग सुरू होते. अजूनही अनेक घरांत हा मसाला वर्षभरासाठी करून ठेवला जातो.

काळा मसाला हा फक्त मसाला नसून महाराष्ट्राच्या पारंपरिक स्वयंपाकाचा आत्माच आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक घराची रेसिपी थोडी वेगळी असते. कुणी खोबरं जास्त घालतात, कुणी तिखटपणा वाढवतात तर कुणी सुगंधासाठी खास खडे मसाले वापरतात. पण या मसाल्यामुळे साधी भाजीसुद्धा अप्रतिम लागते.

आज आपण अगदी घरगुती पद्धतीने सुगंधी आणि टिकाऊ काळा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

kala masala recipe marathi boli marathi
kala masala recipe marathi

काळा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य:-

* सुकी लाल मिरची – ५०० ग्रॅम
* धणे – २५० ग्रॅम
* सुके खोबरे – २०० ग्रॅम
* जिरे – ५० ग्रॅम
* शहाजिरे – २५ ग्रॅम
* तीळ – ५० ग्रॅम
* खसखस – २५ ग्रॅम
* बडीशेप – २५ ग्रॅम
* दालचिनी – १० ग्रॅम
* लवंग – १० ग्रॅम
* काळी मिरी – १० ग्रॅम
* तमालपत्र – ८ ते १०
* दगडफूल – १० ग्रॅम
* नागकेशर – ५ ग्रॅम
* हिरवी वेलची – ८ ते १०
* मसाला वेलची – २
* जायपत्री – २ तुकडे
* जायफळ – १
* सुंठ – २० ग्रॅम
* मेथीदाणे – १ चमचा
* हळकुंड – २ ते ३
* मीठ – चवीनुसार

काही भागांत या मसाल्यात कांदा, लसूण किंवा तेलात भाजलेले मसालेही वापरले जातात. विदर्भ, मराठवाडा आणि कोल्हापूर भागात काळ्या मसाल्याच्या चवीत थोडाफार फरक दिसून येतो.

काळा मसाला बनवण्याची कृती:-

१. मिरच्या स्वच्छ करून घ्या

सगळ्यात आधी लाल मिरच्यांचे देठ काढून त्या स्वच्छ कापडाने पुसून घ्या. मिरच्यांमध्ये ओलसरपणा राहू देऊ नका. उन्हात थोड्या वेळ ठेवल्या तर मसाला अधिक टिकतो.

२. खोबरं भाजून घ्या

कढई गरम करून त्यात सुके खोबरे मंद आचेवर भाजा. खोबरं छान तपकिरीसर झालं की त्याचा अप्रतिम सुगंध यायला लागतो. काळा मसाल्याला त्याचा खास रंग आणि चव याच भाजलेल्या खोबर्‍यामुळे मिळते.

३. धणे आणि इतर मसाले भाजा

आता एकेक करून धणे, जिरे, शहाजिरे, बडीशेप, तीळ, खसखस भाजून घ्या. नंतर खडे मसाले हलकेसे भाजा. मसाले जास्त भाजू नका, नाहीतर मसाल्याला कडवट चव येऊ शकते.

४. सर्व साहित्य थंड करा

भाजलेले सर्व मसाले पूर्णपणे थंड होणं खूप महत्त्वाचं आहे. गरम असतानाच दळले तर मसाला ओलसर होतो आणि लवकर खराब होऊ शकतो.

५. मसाला दळून घ्या

सर्व साहित्य एकत्र करून गिरणीत किंवा मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. घरभर दरवळणारा तो सुगंध म्हणजे खऱ्या काळ्या मसाल्याची ओळख असते.

काळा मसाला साठवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी:-

* मसाला पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा.
* नेहमी कोरडा चमचा वापरा.
* हवाबंद डब्यात ठेवल्यास मसाला वर्षभर टिकतो.
* फ्रिजमध्ये ठेवल्यास सुगंध अधिक काळ राहतो.

काळा मसाला हा खूप बहुगुणी मसाला आहे. या सगळ्या पदार्थांत तो विशेष चव आणतो:

* भरली वांगी
* मसाले भात
* काळी आमटी
* उसळ
* मटकीची भाजी
* मटण रस्सा
* चिकन कालवण
* मिसळ
* पिठलं-भाकरीसोबतची झणझणीत भाजी

महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये रोजच्या स्वयंपाकात काळा मसाला वापरला जातो. विशेषतः वांग्याच्या भाजीत हा मसाला घातला की त्याचा सुंगंध चार घरांपर्यंत दरवळतोच. 

बाजारात अनेक प्रकारचे तयार मसाले मिळतात. पण घरच्या घरी केलेल्या काळ्या मसाल्याची गोष्टच वेगळी असते. प्रत्येक वेळी डबा उघडला की येणारा सुगंध मन अगदी खुश करून टाकतो. त्यात कृत्रिम रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे तो अधिक आरोग्यदायीही ठरतो.

पूर्वी आजी-आई उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मसाले करून ठेवायच्या. गिरणीवर मसाला दळायला नेल्यावर संपूर्ण परिसर सुगंधाने भरून जायचा. आजही त्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत.

 काही खास टिप्स:-

* जर जास्त तिखट नको असेल तर बेडगी मिरची वापरा.
* मसाला अधिक खमंग हवा असेल तर खोबरं थोडं जास्त भाजा.
* थोडासा तेलकटपणा हवा असल्यास थोडेसे तेल घालून मसाले भाजू शकता.
* मसाला दळताना थोडं मीठ घातल्यास चव छान येते.

गरम भाकरी आणि घरचा काळा मसाला घालून केलेली वांग्याची भाजी , यापेक्षा भारी जेवण दुसरं कोणतं असू शकतं? 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top