उकडीचे मोदक
मोदकाच्या उकडीचे सारण
साहित्य :
दोन मोठे नारळ, अडीच वाट्या गुळ, पाऊण वाटी साखर, पाव चमचा वेलदोडा पूड, पाव चमचा जायफळ पूड
सारणाची कृती :
नारळ खोवून त्यात गुळ आणि साखर घालून करंज्यांना शिजवतो असे सैलसर मिश्रण शिजवावे. त्यात जायफळ, वेलदोड्याची पूड घालून सारखे करून ठेवावे. मिश्रण आदल्या रात्री करून ठेवल्यास चांगले होते.
उकड
साहित्य :
धुतलेल्या तांदुळाची पिठी पाच वाटी, पाणी साडेचार वाट्या
उकडीची कृती :
साधारण अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून दळून आणावे. यासाठी आंबेमोहोर तांदूळ वापरल्यास पिठीला चांगला चिकटपणा येतो.
साडेचार वाट्या पाणी उकळत ठेवावे. उकळी आल्यावर त्यात दोन डाव तेल, अर्धा चमचा मीठ घालावे. हळूहळू पिठी घालावी. डावाने किंवा लाटण्याने घोटावी.
गॅस मंद करून दोन तीन चांगल्या वाफा येऊ द्याव्या. वर झाकण ठेवावे. नंतर परातीत निम्मी निम्मी उकड घेऊन तेलाच्या हाताने गरमच मळावी. आणि पुन्हा पातेल्यात झाकून ठेवावी.
सुरुवातीला मोदक करण्यास वेळ लागतो म्हणून मंद गॅस वर तवा ठेवून त्यावर उकडीचे पातेले ठेवावे. म्हणजे उकड गरम राहते.
मोदक करताना लिंबाएवढा गोळा घ्यावा. तेलाच्या हाताने पारी उभी पातळ करावी. त्यात दिड ते दोन चमचे सारण घालावे. थोड्या थोड्या अंतरावर दोन बोटांच्या चिमटीने दाबावे आणि वरून बंद करावे.
टोकावर जास्त उकड राहिली असे वाटल्यास काढून टाकावी. मोदकपात्रात एक स्वच्छ ओले फडके ठेवावे. आणि त्यावर मोदक उकडून घ्यावे.
मोदकपात्र नसेल तर एका मोठ्या भांड्यात आधण ठेवावे. त्यात बसेल अशी चाळणी ठेवावी. त्यात स्वच्छ कापड ठेवावे. आणि त्यावर मोदक उकडून घ्यावे. वरचे तटाचे झाकण घट्ट बसवावे. साधारण दहा मिनिटे मोदक उकड्ण्यास लागतात.
गॅस मंद करून किंचित वाफ जाऊ द्यावी आणि गार पाण्यात हात बुडवून मोदक काढावे म्हणजे वाफेचा चटका लागत नाही.
खास टिप्स :
* मोदकपात्र नसल्यास इडलीपात्रातही मोदक छान उकडले जातात.
* सारण नुसते गुळाचे केले तरी खमंग लागते. आवडत असेल तर निम्मी साखर, निम्मा गुळ असे हि करू शकता.