ओल्या नारळाच्या करंज्या | Olya naralachi karanji

ओल्या नारळाच्या करंज्या 

ओल्या नारळाच्या करंज्या , olya naralachi karanji recipe in marathi, diwali faral, diwali recipes in marathi,

सारणाचे साहित्य : 

एक मोठा नारळ, दिड वाटी साखर, चार वेलदोडे आणि आवडत असल्यास किंचित जायफळ पूड 

कव्हरचे साहित्य : 

एक वाटी बारीक रवा, एक वाटी मैदा, तळण्यासाठी तूप 

कृती :

प्रथम खोवलेला नारळ आणि साखर एकत्र शिजवत ठेवावे. सारण अगदी कोरडे होऊ देऊ नये. मऊसर ठेवावे. पातेल्याच्या कडेने सुटत आले कि वेलदोडा पूड घालून खाली उतरवावे. आणि थोडे गार होऊ द्यावे. 

कव्हरसाठी रवा, मैदा, चार चमचे कडकडीत तुपाचे मोहन आणि चवीपुरते मीठ घालून निम्मे दूध, निम्मे पाणी अश्या मिश्रणात घट्ट भिजवावे. याकरता साधारण दूध आणि पाणी मिळून एक वाटी लागेल. हे पीठ भिजवून झाकून ठेवावे. तासाभराने हे पीठ चांगले कुटून घ्यावे. 

त्याच्या सुपारीएवढ्या गोळ्या कराव्या.  एक एक गोळी पुरीप्रमाणे पातळ लाटावी. त्यात साधारण एक ते दिड चमचा सारण बसेल. 

ते घालून दोन्ही बाजू मिळून पोळपाटावर कडेने घट्ट दाबावे. आणि कडेने कातण्याने कापावे. किंवा काटेचमचाने दाबून करंजीचे काटे काढावे.

तुप चांगले तापवून घ्यावे. या करंज्या तुपात खमंग गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्याव्या. 

खास टिप्स : 

* करंज्या करतांना सर्व करंज्या प्रथम तयार करून घ्याव्या. त्या वाळून जाऊ नये म्हणून ओल्या फडक्याखाली झाकून ठेवाव्या. म्हणजे एकदम तळायला घेता येतात.

* करंजी बंद करतांना कडेने कोरडे वाटल्यास दुधाचे बोट फिरवावे म्हणजे घट्ट दाबले जाते आणि तळताना आतील सारण बाहेर येत नाही. 

* आवडत असल्यास सारणात काजू किंवा बदामाचे तुकडे तसेच मनुके घालू शकतात. सारण परततांना हा सुका मेवा घालावा.