साटोऱ्या | Satori recipe

साटोऱ्या 

साटोऱ्या, satori recipe in marathi, diwali faral, marathi recipes, diwali sweets, afternoon snacks

सारणाचे साहित्य :

दोन वाट्या बारीक रवा, दोन वाट्या गुळ, पाच वेलदोडे, तूप दोन चमचे, खसखस अर्धी वाटी 

सारणाची कृती : 

तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. गुळाचा पाणी न घालता एकतारी पाक करावा. त्यात भाजलेला रवा टाकावा. हे मिश्रण नीट मिक्स करून गॅस बंद करावा आणि हे मिश्रण १५-२० मिनटे झाकून ठेवावे. 

अर्धी वाटी खसखस खमंग भाजून घ्यावी. जरा गार झाल्यावर  मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. वेलदोड्याची पूड करून घ्यावी. खसखस आणि वेलदोडा पूड सारणात टाकून चांगले मिक्स करावे. 

कव्हरसाठी साहित्य : 

दोन वाट्या कणिक, एक डाव तेल, तळण्यासाठी तूप किंवा रिफाईंड तेल 

कव्हरची कृती : 

कणकेत गरम तेलाचे मोहन घालावे. पुरीच्या कणकेसारखी कणिक घट्ट भिजवावी.

पेढ्याएवढा कणकेचा गोळा घ्यावा. त्यात साधारण तेवढेच किंवा मावेल एवढे सारण घ्यावे. गोळा थोडा लाटून घ्यावा. 

त्यात पुरपोळीप्रमाणे सारण भरावे. तांदुळाच्या पिठावर साटोरी अलगद लाटावी.

एकीकडे तवा तापत ठेवावा. आणि सर्व साटोऱ्या तव्यावर दोन्ही बाजूने नुसत्या शेकून घ्याव्या. नंतर तेलात अगर तुपात तळाव्या. यामुळे तेल / तूप कमी लागते. 

खास टिप्स:

* या साटोऱ्या १५ दिवस छान टिकतात. प्रवासात नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

* या साटोऱ्यांमध्ये खवा घालायचा असल्यास अर्धी वाटी खवा मोकळा करून सारणात घालावा. पण या साटोऱ्या खवा घालण्यास जास्त दिवस टिकणार नाही. त्यांना फ्रिज मध्ये ठेवल्यास ४-५ दिवस राहू शकतात. 

* सारण आदल्या दिवशी करून ठेवल्यास साटोऱ्याची चव आणखी चांगली होते.